Marathi govt jobs   »   Study Materials   »   समास

समास | महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य

समास

महाराष्ट्रातील बहुतेक स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी भाषा हा विषय असतोच. मराठी भाषेत सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी व्याकरण. परीक्षेमध्ये मराठी विषयात मराठी व्याकरणावर हमखास प्रश्न विचारले जातात. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मराठी व्याकरण हा कमी वेळेमध्ये जास्त गुण मिळवून देणारा विषय आहे. थोड्याशा सरावाने या विषयामध्ये जास्त गुण मिळवता येतात. आज या लेखात आपण मराठी व्याकरणातील समास,त्याचे प्रकार त्यांच्या व्याख्या व अधिक सरावासाठी त्यावर काही प्रश्न – उत्तरे याबद्दल माहिती पाहणार आहोत.

Title 

Link  Link 

महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास योजना

अँप लिंक वेब लिंक 

समास- आपण अनेकदा बोलत असताना बोलण्याच्या ओघात कधी-कधी काही मराठी शब्द गाळून सुटसुटीत असे जोडशब्द बनवितो त्यास समास असे म्हणतात. 

उदा. ‘पोळीसाठी पाट’ या दोन शब्दांऐवजी पोळपाट असा जोडशब्द वापरला जातो. मराठी भाषेत दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्दांचे एकत्रीकरण करून त्यांचा एक शब्द करण्याची परंपरा फार जुनी आहे. 

उदा. वडापाव – वडा घालून तयार केलेला पाव
पोळपाट – पोळी करण्यासाठी लागणारे पाट
कांदेपोहे – कांदे घालून तयार केलेले पोहे
पंचवटी – पाच वडांचा समूह

समासांचे मुख्य प्रकार

समासात किमान दोन शब्द किंवा दोन पदे एकत्र येतात. या दोन शब्दांपैकी कोणत्या पदाला अधिक महत्त्व आहे त्यावरून समासाचे 4 प्रकार पडतात.

समासाचे नाव    प्रधान पद
अव्ययीभाव      पहिले
तत्पुरुष       दुसरे
द्वंद्व      दोन्ही
बहुव्रिही      अन्य

1. अव्ययीभाव समास

ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो, त्यास ‘अव्ययीभाव समास’ असे म्हणतात. अव्ययीभाव समासात आपल्याला भाषेतील खालील उदाहरणे पाहावयास मिळतात.

a) मराठी भाषेतील शब्द

गावोगावी – प्रत्येक गावी
गल्लोगल्ली – प्रत्येक गल्लीत
दारोदारी – प्रत्येक दारी
मराठी भाषेतील पहिल्या शब्दांचीच पुनरावृत्ती होऊन तयार झालेले शब्द हे क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातात म्हणून ही उदाहरणे अव्ययीभाव समासाची आहेत.

b) संस्कृत भाषेतील शब्द

प्रति (प्रत्येक)– प्रतिमास, प्रतिक्षण, प्रतिदिन
आ (पर्यंत) – आमरण
प्रति, आ हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत. संस्कृत मधील उपसर्गांना अव्यय मानले जाते. 

c) अरबी व फारसी भाषेतील शब्द

दर (प्रत्येक) – दरसाल, दरडोई, दरमजल
गैर (चुकीचा) – गैरसमज, गैरहजर, गैरशिस्त
मराठी भाषेमध्ये फारसी व अरबी भाषेतील उपसर्ग लागून अव्ययीभाव समासाची उदाहरणे तयार झाली आहेत.

2. तत्पुरुष समास

ज्या समासात दुसरा शब्द प्रधान(महत्त्वाचा) असतो, त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.

उदा. महामानव – महान असलेला मानव
राजपुत्र – राजाचा पुत्र
a) विभक्ती तत्पुरुष

ज्या तत्पुरुष समासात विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात, त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. 

b) अलुक् तत्पुरुष

ज्या विभक्ती तत्पुरुष समासात पहिला पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही, त्यास अलुक् तत्पुरुष समास म्हणतात. अलुक् म्हणजे लोप न पावणारा (लुक्= लोप होणे). 

c) उपपद तत्पुरुष/ कृदंत तत्पुरुष

ज्या तत्पुरुष समासात दुसरे पद महत्त्वाचे असून व ते दुसरे पद हे धातुसाधित/ कृदंत म्हणून त्या शब्दांत येते, तसेच त्याचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही अशा समासास उपपद तत्पुरुष/ कृदंत तत्पुरुष असे म्हणतात. 

d) नञ् तत्पुरुष समास

ज्या तत्पुरुष सामासातील प्रथम पद हे नकारार्थी असते, त्यास नञ् तत्पुरुष समासअसे म्हणतात. 

e) कर्मधारय तत्पुरुष समास

ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात व त्या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य या प्रकारचा असतो त्यालाच कर्मधारेय तत्पुरुष समास म्हणतात. 

f) व्दिगू समास

ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्याविशेषण असते व त्या सामासिक शब्दांतून एक समूह सुचविला जातो. त्याला व्दिगू समास असे म्हणतात. या समासास संख्यापूर्वपद कर्मधारय समास असेही म्हणतात. 

g) मध्यमपदलोपी समास

ज्या सामासिक शब्दांतील पहिल्या पदांचा दुसऱ्या पदाशी संबंध दर्शविणारी मधली काही पदे लोप करावी लागतात त्या समासाला मध्यमपदलोपी समास असे म्हणतात. या समासास लुप्तपद कर्मधारय समास असेही म्हणतात.

3.व्दंव्द समास :

ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्ट्या समान दर्जाची असतात. त्यास ‘व्दंव्द समास’ असे म्हणतात. या समासातील पदे आणि, अथवा, व, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. 

व्दंव्द समासाचे 3 प्रकार पडतात.

a) इतरेतर व्दंव्द समास

ज्या समासाचा विग्रह करतांना आणि, व, ही, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो. त्यास इतरेतर व्दंव्द समास असे म्हणतात. 

b) वैकल्पिक व्दंव्द समास

ज्या समासाचा विग्रह करतांना किंवा, अथवा, वा ही विकल्प बोधक उभयन्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यासवैकल्पिक व्दंव्द समास असे म्हणतात.

c) समाहार व्दंव्द समास

ज्या समासातील पदांचा विग्रह करतांना त्यातील पदांचा अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश म्हणजेच समाहार केलेला असतो त्यास समाहार व्दंव्द समास असे म्हणतात.

4.बहुव्रीही समास

ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात. 

a) विभक्ती बहुव्रीही समास

ज्या समासाचा विग्रह करताना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते त्याला विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात. 

b) नञ् बहुव्रीही समास

ज्या समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला नञ् बहुव्रीही समास असे म्हणतात. या समासातील पहिल्या पदात अ, न, अन,नी अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केला जातो. 

c) सहबहुव्रीही समास

ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद ‘सह’ किंवा ‘स’ अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एखाद्या विशेषणाचे कार्य करतो त्यास सहबहुव्रीही समास म्हणतात. 

d) प्रादिबहुव्रीही समास

ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, दूर, सु, वि अशा उपसर्गांनी युक्त असेल तर त्याला प्रादिबहुव्रीही समास असे म्हणतात. 

सरावासाठी समासावरील अतिमहत्वाचे प्रश्न – उत्तरे :

Q1. हा शब्द सामासिक शब्द नाही.

(a)   गोपाल

(b)  शीतलतनू

(c)   भालचंद्र

(d)  वरील सर्व शब्द सामासिक आहेत 

Q2. ‘भोजनभाऊ’ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ?

(a)   भोजनासाठी भाऊ

(b)  भोजनपंक्तीतील भाऊ

(c)   सख्खा भाऊ

(d)  भोजनापुरता भाऊ

Q3. द्वंद्व समासाचा कोणता प्रकार मराठीत नाही? 

(a)   इतरेतर द्वंद्व

(b)  एकशेष द्वंद्व

(c)   समाहार द्वंद्व

(d)  वैकल्पिक द्वंद्व

Q4.’नेआण’ या शब्दाचा समास कोणता?

(a)   द्वंद्व समास

(b)  बहुव्रीही समास

(c)   समाहार समास

(d)  इतरेतर द्वंद्व समास

Q5.विधाने ओळखा :

अ) आजन्म हा अव्ययीभाव आहे.

ब) महामानव हा द्वंद्व समास आहे.

क) तोंडपाठ तत्पुरुष आहे.

ड) श्वेतकमल हा बहुव्रीही समास आहे.

(a)   ब, ड बरोबर

(b)  अ,ड बरोबर

(c)  अ, क, बरोबर

(d)  क, ड बरोबर

Q6. ‘दीपाचा चुलत सासरा म्हणजे देवमाणूस आहे. या वाक्यातील ‘चुलत सासरा’ ‘हा सामासिक शब्द ……………..या समासाचे उदाहरण आहे. 

(a)   समाहार द्वंद्व समास

(b)  इतरेतर द्वंद्व समास

(c)   मध्यमपदलोपी समास

(d)  वैकल्पिक द्वंद्व समास

Q7. ‘तो गावोगाव भटकत फिरला’ या वाक्यातील ‘गावोगाव’ हा शब्द कोणत्या समास प्रकारातील आहे? 

(a)   उपपद तत्पुरुष समास

(b)  बहुव्रीही समास

(c)   द्वंद्व समास

(d)  अव्ययीभाव समास

Q8. ‘नीलकंठ’ या शब्दाचा समास ओळखा. 

(a)   द्वंद्व समास

(b)  कर्मधारय समास

(c)   बहुव्रीही समास

(d)  द्विगू समास

Q9. ‘प्राप्त आहे धन ज्यास तो’ या विग्रहाचा सामासिक शब्द ओळखा.

(a)   धनश्री

(b)  धनप्राप्ती

(c)   प्राप्तधन

(d)  प्राप्तोदक

Q10. ‘देशगत’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? 

(a)   तृतीया तत्पुरुष

(b)  षष्ठी तत्पुरुष

(c)   द्वितीया तत्पुरुष

(d)  सप्तमी तत्पुरुष

Q11.’उपपद’ किंवा ‘कृदन्त – तत्पुरुष’ समासाचे उदाहरण कोणते ?

(a)   नास्तिक

(b)  रक्तचंदन

(c)   अहिंसा

(d)  पांथस्थ

Q12. पुढीलपैकी कोणता सामासिक शब्द समाहार द्वंद्व समासात आढळत नाही?

(a)   केरकचरा

(b)  नीलकंठ

(c)   घरदार

(d)  मीठभाकर

Q13. ‘तोंडी लावणे’ हा सामासिक शब्द समासाच्या कोणत्या प्रकारातील आहे?

(a)   उपपद तत्पुरुष

(b)  कर्मधारय

(c)  अलुक् तत्पुरुष

(d)  द्विगू

Q14.‘गडी गायरानात गुरे घेऊन गेला आहे’

वरील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात येतो ?

(a)   सामासिक शब्द

(b)  अध्यस्त शब्द

(c)   तत्सम शब्द

(d)  तद्भव शब्द

Q15.खालीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ?

(a)   नास्तिक

(b)  नवरात्र

(c)   मीठभाकर

(d)  पीतांबर 

Solutions

S1. Ans (d)

Sol.  

1) गोपाल

2) शीतलतनू

3) भालचंद्र

हे सर्व शब्द सामासिक शब्द आहेत.

सामासिक शब्द = मिश्रित शब्द

S2. Ans (d)

Sol. 

भोजनभाऊ – भोजनापुरता भाऊ. 

ज्या सामासिक शब्दातील पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखवणारी मधली काही पदे लोप (लुप्त) करावी लागतात, तेव्हा अशा समासाला मध्यमपदलोपी समास असे म्हणतात.

S3. Ans (b)

Sol. 

इतरेतर द्वंद्व,समाहार द्वंद्व व वैकल्पिक द्वंद्व हे तीन द्वंद्व समासाचे प्रकार आहेत. 

S4. Ans (d)

Sol.

नेआण –  नेणे आणि आणणे. 

ज्या द्वंद्व समासाचा विग्रह करताना ‘आणि’, ‘व’ यापैकी एखाद्या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करावा लागतो, त्या समासास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. या समासामधील सामासिक शब्दाचा विग्रह केला जातो, तेव्हा ती पदे एकमेकांना ‘आणि’, ‘व’ यापैकी एखाद्या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत, असे लक्षात येते.

S5. Ans (c)

Sol.

महामानव – महान असा मानव – कर्मधारय समास.

श्वेतकमळ –  पांढरे असे कमळ – कर्मधारय समास. 

आजन्म – जन्मापासून

तोंडपाठ – तोंडाने पाठ – तृतीय तत्पुरुष समास. 

S6. Ans (c)

Sol.

ज्या सामासिक शब्दातील पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखवणारी मधली काही पदे लोप (लुप्त) करावी लागतात, तेव्हा अशा समासाला मध्यमपदलोपी समास असे म्हणतात.

S7. Ans (d)

Sol. 

गावोगाव हा अव्ययीभाव समासातील मराठी शब्दाची द्विरुक्ती होवून बनलेला सामासिक शब्द आहे. 

S8. Ans (c)

Sol. 

नीलकंठ – निळा आहे कंठ ज्याचा असा तो. 

ज्या सामासिक शब्दातील कोणतेही पद अर्थाच्या दृष्टीने प्रमुख नसून त्या पदांच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा नामाचा किंवा वस्तूचा त्या शब्दामधून बोध होतो त्या समासाला ‘बहुव्रीही समास’ असे म्हणतात.

S9. Ans (c)

Sol. 

प्राप्तधन – प्राप्त आहे धन ज्यास तो. 

हे द्वितीया बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे.

S10. Ans (c)

Sol. 

द्वितीया तत्पुरुष समासाचे उदाहरणे –

देशगत : देशाप्रत गेलेला

दुःखप्राप्त : दुःखाला प्राप्त

S11. Ans (d)

Sol.

उपपद/कृदन्त तत्पुरुष समास – यातील दुसरे पद हे धातूसाधिते/कृदन्ते असतात.

उदा- ग्रंथकार, कुंभकार, पांथस्थ, मार्गस्थ. 

S12. Ans (b)

Sol.

नीलकंठ – निळा आहे कंठ ज्याचा असा तो. 

ज्या सामासिक शब्दातील कोणतेही पद अर्थाच्या दृष्टीने प्रमुख नसून त्या पदांच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा नामाचा किंवा वस्तूचा त्या शब्दामधून बोध होतो त्या समासाला ‘बहुव्रीही समास’ असे म्हणतात.

S13. Ans (c)

Sol. 

तोंडी लावणे हे अलुक तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे.

अलुक् म्हणजे – लोप न पावणारा

ज्या विभक्ती तत्पुरूष समासामध्ये पूर्वपदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही, त्याला अलुक् तत्पुरूष 

समास  म्हणतात. 

S14. Ans (a)

Sol.

गायरान – गाईसाठी रान 

हा चतुर्थी तत्पुरुष समास आहे. 

त्यामुळे गायरान हा शब्द सामासिक शब्द आहे.

S15. Ans (c)

Sol.

मीठभाकर – मीठ, भाकरी व तत्सम पदार्थ 

हे समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

MAHARASHTRA MAHA PACK

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप

Sharing is caring!

FAQs

स्पर्धा परीक्षेत मराठीतील समासावर प्रश्न विचारले जातात का ?

होय,स्पर्धा परीक्षेत मराठीतील समासावर हमखास प्रश्न विचारले जातात.

समास म्हणजे काय ?

आपण अनेकदा बोलत असताना बोलण्याच्या ओघात कधी-कधी काही मराठी शब्द गाळून सुटसुटीत असे जोडशब्द बनवितो त्याला समास असे म्हणतात.

इतका महत्त्वाचा लेख कुठे मिळेल?

Adda 247 मराठीच्या अधिकृत वेबसाइटवर तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांच्या सूचना, अभ्यासक्रम, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि अभ्यास साहित्य मिळेल.