Table of Contents
दारिद्र व बेरोजगारी
भारत हा विकसनशील देश आहे आणि जगात वेगाने वाढणारी एक अर्थव्यवस्था आहे. भारताच्या विकासामध्ये दारिद्र व बेरोजगारी समस्या हे एक मोठे आव्हान आहे. यामुळे मूलभूत गरजांपासून वंचित राहणे किंवा उपलब्ध संधी नाकारणे यामुळे समाजातील काही व्यक्ती किंवा समूह मुख्य प्रवाहापासून दूर जातात. दीर्घकालीन बेरोजगारी ही मोठ्या प्रमाणावर वाढणारे दारिद्र्य व संथ गतीने होणारा आर्थिक विकास दर्शविते. बहुतांश तरुणांना बेरोजगारीस सामोरे जावे लागते. तरुण वर्ग ही मोठी मानवी साधनसंपत्ती, आर्थिक विकास व तांत्रिक नवकल्पनेची चालकशक्ती व गुरुकिल्ली आहे. भारत हा तरुणांचा देश आहे.
Title |
Link | Link |
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना Maharashtra Police Constable Recruitment 2024 : Study Plan |
अँप लिंक | वेब लिंक |
Police Bharti 2024 Shorts | पोलीस भरती 2024 शॉर्ट्स | Subject Wise Plan
|
अँप लिंक | वेब लिंक |
दारिद्र व बेरोजगारी: दारिद्र्याबद्दल थोडक्यात माहिती
आपल्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी उपलब्ध होणारी साधने ज्यांना अपुरी पडतात, अशा माणसांची स्थिती म्हणजे दारिद्र्य असे स्थूलमानाने म्हणता येईल. या संदर्भात मूलभूत गरजा कोणत्या, हे निश्चित करावे लागते. मूलभूत गरजांची व्याख्या मर्यादित किंवा व्यापक अशा दोनही दृष्टींनी करता येते. केवळ जिवंत राहण्यासाठी ज्या आवश्यक त्याच मूलभूत गरजा, अशी मर्यादित व्याख्या केल्यास उपासमारीच्या जवळपास टेकलेले लोक दरिद्री समजावे लागतील. मूलभूत गरजांचा व्यापक दृष्ट्या विचार केल्यास ज्यांना अन्न, वस्त्र आणि निवारा या गोष्टी जगण्यासाठी पुरेशा परंतु सर्वसाधारण जनतेच्या राहणीमानाशी तुलना करता कमी दर्जाच्या असतात, त्या सर्वांना दरिद्री समजावे लागेल. अर्थात दारिद्र्य ही एक सापेक्ष संकल्पना आहे. निरनिराळ्या राष्ट्रांच्या दरिद्री लोकांची राहणी अन्य राष्ट्रातील दरिद्री लोकांच्या राहणीच्या मानाने कितीतरी उच्च पातळीवरील असू शकेल. उदा. अमेरिकेसारख्या विकसित औद्योगिक राष्ट्रामध्ये दरिद्री या सदरात मोडणाऱ्या लोकांजवळ मोटार, प्रशीतक, धुलाईयंत्र, दूरचित्रवाणी इ. असू शकतील. अनारोग्य, शिक्षणाचा व कौशल्यांचा अभाव, समाजापासून फटकून राहण्याची प्रवृत्ती, विध्वंसक वा बेशिस्त वागणूक, दूरदृष्टीचा अभाव इ. गोष्टीही दारिद्र्याशी निगडित असलेल्या आढळतात, परंतु दारिद्र्याच्या व्याख्येत त्यां समावेश सहसा करीत नाहीत. मात्र दारिद्र्याचे परिणाम व्यक्तिमात्रास तसेच समाजास नुकसानकारक ठरतात, यांबद्दल एकमत आहे.
दारिद्र व बेरोजगारी: दारिद्राचे प्रकार
दारिद्राचे अनेक प्रकार आढळतात त्यातील प्रमुख प्रकारांबद्दल यथे माहिती देण्यात आली आहे.
अल्पकालीन दारिद्र: औद्योगिक राष्ट्रांमधील जीवनमान व्यापारचक्रानुसार बदलत असते. मदीच्या काळात तेथील बेकारी वाढते, वस्तूंचे भाव घसरतात, उत्पादन व उत्पन्न यांच्यामध्ये घट होते. या घटनांचा परिणाम समाजातील निकृष्ट उत्पन्नाच्या गटातील लोकांना विशेष जाणवतो. त्यांना आर्थिक मदत देऊन किंवा तात्कालिक सार्वजनिक कामे हाती घेऊन हे संकट कमी करण्याचे प्रयत्न करण्यात येतात. मंदीचा काळ संपला म्हणजे अर्थव्यवस्था पुन्हा भरभराटीच्या मार्गास लागते आणि दारिद्र कमी होते.
दीर्घकालीन सामूहिक दारिद्र: दारिद्र सामूहिक स्वरूपाचे आणि दीर्घकाळ टिकणारेही असू शकते. बऱ्याच अविकसित व अर्धविकसित राष्ट्रांमध्ये सापेक्षतया ते जवळजवळ सार्वत्रिकच असते. आशियातील बराचसा प्रदेश, मध्यपूर्व आफ्रिका आणि मध्य व द. अमेरिका यांमधील बऱ्याचशा भागांतील बहुसंख्य लोकांचे राहणीमान अत्यंत निकृष्ट आहे. उपासमार, अपपोषण, अल्पायुष्य, बालमृत्युंचे आणि प्रसूतिकाळी स्त्रियांच्या मृत्युसंख्येचे मोठे प्रमाण व अनारोग्य ही दरिद्री लोकसंख्येची सामान्य लक्षणे आढळतात. असे दारिद्र्य सामान्यतः आर्थिक विकासाचा अभाव दर्शविते. या राष्ट्रांजवळील साधमसामग्रीच अपुरी असते. तिचे समप्रमाणात सर्व लोकांमध्ये वाटप केले, तरी त्यांना पुरेशा जीवनसुविधा मिळणे अशक्य होईल. यावर दोन उपाय संभवतात. एकतर कृषिविकास व औद्योगिकरण यांच्या द्वारे एकुण राष्ट्रीय उत्पादन वाढविणे व दुसरा म्हणजे लोकसंख्यावाढीचे नियंत्रण करणे.
दीर्घकालीन व्यक्तिगत दारिद्र: सार्वत्रिक भरभराटीच्या वातावरणातसुद्धा काही व्यक्ती दीर्घकाळपर्यंत दरिद्रीच राहतात. याचे कारण त्या आपल्या व आपल्या कुटुंबाच्या मूलभूत गरजा भागविण्यास असमर्थ असतात. त्यांचे शारीरिक व मानसिक दौर्बल्य, अपुरे शिक्षण व प्रशिक्षण आणि समाजाशी जुळवून घेण्याची त्यांची असमर्थता यांमुळे त्यांचे उत्पन्न दारिद्र्यरेषेच्या खाली असते. त्यांच्या शिक्षणाची सोय करून व त्यांना सुरक्षित कामधंदा पुरवून मदत करता येते. काहींच्या बाबतीत तर आळस, नशाबाजी, गुन्हेगारी प्रवृत्ती यांसारख्या दोषांमुळे ते चिरकाल दरिद्री राहतात.
ग्रामीण दारिद्र: ग्रामीण भागातील विशिष्ट क्षेत्रा तील लोकांना मूळ गरजांपासून वंचित राहणे याला ग्रामीण दारिद्र्य असे म्हणतात. हे दारिद्र्य सीमांत व अल्पभूधारक शेतकरी, भमिूहीन शेतमजूर, कंत्राटी कामगार, इत्यादीमध्ये दिसून येते. शेतीतील कमी उत्पादकता, दुष्काळ, निकृष्ट ग्रामीण पायाभूत सुविधा, पर्यायी रोजगाराची कमतरता, ग्रामीण कर्जबाजारीपणा, निरक्षरता इत्यादींमुळे ग्रामीण दारिद्र्यात वाढ झाली आहे.
शहरी दारिद्र: शहरी भागातील विशिष्ट क्षेत्रातील लोकसंख्येत मूळ गरजांची कमतरता असते त्यास शहरी दारिद्र्य म्हणतात. शहरी दारिद्र्य मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील लोकांचे झालेले वाढते स्थलांतर, न परवडणारी घरे, निरक्षरता, मंद गतीने औद्योगिक वृद्धी व पायाभूत सुविधांची कमतरता या कारणांमुळे वाढते आहे.
दारिद्र व बेरोजगारी: बेरोजगारीबद्दल थोडक्यात माहिती
साधारणपणे ज्याला उत्पादकीय प्रक्रियेत कोणताही लाभ होत नाही त्यास बेरोजगारी असे म्हणतात. बेरोजगारीचा अर्थ असा की, ज्या परिस्थितीत 15 ते 59 वयोगटांतील व्यक्तींना प्रचलित वेतनदरावर काम
करण्याची इच्छा व पात्रता असूनही रोजगार मिळत नाही’. एका व्यक्तीस रोजगार असणे म्हणजे ती व्यक्ती
आठवड्यातले किमान काही तास काम करत असली पाहिजे.
दारिद्र व बेरोजगारी: बेरोजगारीचे प्रकार
बेरोजगारीचे विविध प्रकार आहेत. त्यांचे वर्गीकरण खालील प्रकारे करता येते.
ग्रामीण बेरोजगारी
ग्रामीण भागातील बेरोजगारीला ग्रामीण बेरोजगारी म्हणतात. ग्रामीण बेरोजगारीचे दोन प्रकार आहेत.
- हंगामी बेरोजगारी: हंगाम नसलेल्या काळात जेव्हा लोकांना रोजगार नसतो त्याला हंगामी बेरोजगारी म्हणतात. शेतकऱ्यांना पिकांच्या लागवडीसाठी पावसावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे शेती हा हंगामी व्यवसाय आहे. शेती क्षेत्रातील श्रमशक्ती जवळपास 5 ते 7 महिन्यांसाठी बेरोजगार राहते. शेतीशिवाय स्थलपरत्वे हंगामी बेरोजगारी ही पर्यटन मार्गदर्शक, बँड पथक, साखर कारखाना कामगार, बर्फ फॅक्टरी कामगार व मासेमारी इत्यादी व्यवसायांमध्ये आढळून येते.
- छुपी/प्रछन्न बेरोजगारी: सामान्यत: भारतातील खेड्यांमध्ये ही बेरोजगारी आढळते. ही एक अशी स्थिती आहे की ज्यामध्ये गरजेपेक्षा जास्त लोक काम करताना दिसतात. त्यापैकी काही मजुरांना कामावरून कमी केले तरी उत्पादनावर त्याचा परिणाम होत नाही. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर ती एका विशिष्ट स्थितीशी संबंधित आहे, जिथे अतिरिक्त मनुष्यबळ असून त्यामध्ये काही मजुरांची सीमांत उत्पादकता शून्य असते. शेतजमिनीवरचा अतिरिक्त भार हा ग्रामीण भागात छुपी बेरोजगारी निर्माण करतो. ग्रामीण भागात जवळपास 20% श्रमशक्ती छुप्या बेरोजगारीत आहे. संयुक्त कुटुंब पद्धती, पर्यायी रोजगारांचा अभाव, शेतीवरील लोकसंख्येचा अतिरीक्तभार इत्यादी छुप्या बेकारीची कारणे आहेत.
शहरी बेरोजगारी
शहरी भागात जे बेरोजगार आढळतात, त्यास नागरी बेरोजगारी म्हणतात. खालीलप्रमाणे नागरी बेरोजगारीचे प्रकार आहेत.
सुशिक्षित बेरोजगारी: काम करण्याची इच्छा आणि शिक्षणाची पात्रता असूनही रोजगार मिळत नाही त्यास सुशिक्षित बेरोजगारी म्हणातात. ही बेरोजगारी शालान्त परीक्षा उत्तीर्ण, पदवीपूर्व शिक्षण, पदवीधारक व पदव्युत्तरांमध्ये दिसून येते. शिक्षणाप्रती उदासिनता, पांढरपेशा व्यवसायाला प्राधान्य, व्यावसायिक अभ्यासक्रमाचा अभाव, रोजगाराच्या संधी व सुशिक्षितांमधील असमतोल, उपलब्ध शैक्षणिक संधींची माहिती नसणे ही सुशिक्षित बेरोजगारीची कारणे आहेत.
औद्योगिक बेरोजगारी: शहरातील कारखाने व उद्योगांमधील बेरोजगारीस औद्योगिक बेरोजगारी म्हणतात. हे कामगार कुशल किंवा अकुशल असतात. हा सामान्यत: खुल्या बेरोजगारीचा प्रकार आहे. मंद औद्योगिक वृद्धी, वेगाने वाढणारी लोकसंख्या, प्रशिक्षण सुविधांचा अभाव, आधुनिक तंत्रज्ञानाची कमी स्वीकार्यक्षमता, उद्योगांचे गैरसोयीचे स्थानिकीकरण, श्रमाची कमी गतिशीलता ही औद्योगिक बेरोजगारीची मुख्य कारणे आहेत. औद्योगिक बेरोजगारीचे खालील प्रकार आहेत
- तांत्रिक बेरोजगारी: तंत्रज्ञानातील बदलांमुळे तांत्रिक बेरोजगारी निर्माण होते. आधुनिक तंत्रज्ञान भांडवल प्रधान असून त्यास कमी कामगार लागतात. जेव्हा आधुनिक तंत्रज्ञानांचा स्वीकार औद्योगिक क्षेत्रात केला. जातो. प्रशिक्षणाचा अभाव असल्याने कामगार आपल्या नोकरीवरून विस्थापित होतात.
- संघर्षजन्य बेरोजगारी: उद्योगांमधील संघर्षामुळे निर्माण होणारी बेरोजगारी म्हणजे संघर्षजन्य बेरोजगारी होय. ह्या प्रकारची बेरोजगारी यांत्रिक बिघाड, वीजटंचाई, कच्च्या मालाचा अभाव, कामगारांचा संप इत्यादींमुळे निर्माण होते. संघर्षजन्य बेरोजगारी ही तात्पुरत्या स्वरूपाची असते.
- चक्रीय बेरोजगारी: व्यापारचक्रातील तेजी-मंदीपैकी मंदीच्या परिस्थितीत निर्माण होणाऱ्या बेकारीस चक्रीय बेकारी म्हणतात. मंदीच्या काळात प्रभावी मागणी घटते त्यामुळे उत्पादकांचा नफा आणि किमतीमध्ये घट होते. परिणामी उत्पादक गुंतवणूक व वस्तूंच्या उत्पादनात घट करतो. उत्पादनात घट झाल्याने रोजगारात घट होते. परिणामी कामगारांना बेरोजगारीस सामोरे जावे लागते.
- संरचनात्मक बेरोजगारी: देशाच्या आर्थिक संरचनेत काही लक्षणीय बदलांमुळे ही बेरोजगारी निर्माण होते. हे बदल उत्पादन घटकांच्या मागणी व पुरवठ्यावर परिणाम करू शकतात. अरव्थ्यवस्थेमधील मूलभूत बदल, सरकारी धोरणांमध्ये झालेले बदल, भांडवलाचा तटुवडा, उद्योगाचे एका क्षेत्रा पासून दुसरीकडे झालेले स्थलांतर इत्यादी. ही एक दीर्घकालीन अवस्था आहे. उपलब्ध रोजगार व कामगारांचे कौशल्य यातील तफावतीमुळे संरचनात्मक बेरोजगारी निर्माण होते.
दारिद्र व बेरोजगारी: बेरोजगारीची कारणे
बेरोजगारीची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
- रोजगारविरहित वाढ: भारतातील रोजगाराच्या वाढीचा दर हा आर्थिक वृद्धीपेक्षा फार कमी आहे. वाढत्या श्रमशक्तीला सामावून घेण्याइतका तो पुरेसा नाही. त्यामुळे बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे.
- श्रमशक्तीतील वाढ: मृत्यूदर वेगाने घटला असताना जन्मदर मात्र त्याच प्रमाणात कमी न झाल्याने देशाची लोकसंख्या मात्र वाढली आहे. यामुळे श्रमशक्तीचा विस्तार झालेला असून त्यातून बेरोजगारी वाढलेली आहे.
- यांत्रिकीकरणाचा अतिरिक्त वापर: भारतात मनुष्यबळ मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. कार्यक्षमतेने काम करणाऱ्या मनुष्यबळामुळे देशाकडे श्रमप्रधान उत्पादनाचे तंत्र वापरणे सोईचे असते. परंतु, उद्योगाबरोबरच शेतीक्षेत्रात देखील कामगाराच्या जागी भांडवलाचा वापर होत आहे. जिथे भांडवल मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि मनुष्यबळ मर्यादित आहे तिथे स्वयंचलित यंत्रांचा वापर योग्य ठरतो.
- कौशल्य विकास कार्यक्रमाचा अभाव: भारताच्या लोकसंख्येचा मोठा भाग अशिक्षित व अकुशल मनुष्यबळाचा आहे. भारतीय उद्योगांना पूरक असे शैक्षणिक अभ्यासक्रम मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहेत. व्यावसायिक व कौशल्य विकास अभ्यासक्रमाची कमतरता असल्यामुळे उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत नाही.
- शेतीचे हंगामी स्वरूप: भारतातील शेती हा व्यवसाय हंगामी स्वरूपाचा आहे. शेती पावसावर अवलंबून आहे. जलसिंचनाच्या सुविधांचा अभाव, कमी प्रतीची सुपीक जमीन, कालबाह्य उत्पादन तंत्र, प्रमाणित बियांणांची व खतांची कमतरता असल्यामुळे शेतीची उत्पादकता कमी झाली आहे. वर्षांतून काही महिन्यांसाठी रोजगार मिळतो आणि काही महिने रोजगार उपलब्ध नसतो, त्यामुळे शेतमजुरांच्या श्रमशक्तीचा वापर होत नाही.
- ग्रामीण लोकसंख्येचे स्थलांतर: रोजगाराच्या शोधासाठी ग्रामीण भागातून नागरी भागात लोकसंख्येचे सातत्याने स्थलांतर होत आहे. त्यामुळे नागरी भागात बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.